Special Report | महेबुब शेख प्रकरणाचे ‘राजकारण’ होवू नये!

553

महेबबु शेख .. यांच्या कथित बलात्कार प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. पोलिस तपासानंतर हे प्रकरण खरे आहे की खोटे हे सिध्द होईल, या प्रकरणाचे सत्य बाहेर यावे हीच सर्वांची अपेक्षा आहे.

राजकारणात वावरणार्‍या माणसांकडून आपण ज्या अपेक्षा बाळगतो, त्या खरेच आपण आपल्या वयक्तिक जीवनात पूर्ण करु शकतो का? जसे राजकारणात वारणार्‍या प्रत्येक व्यक्तिचे खाजगी आयुष्य असते, तसे आपलेही प्रत्येकाचे खाजगी आयुष्यात ‘गोड गुपित’ असते.

राजकारण्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत, हे खरे असले तरी आम्ही कसेही वागु पण राजकीय नेत्यांनी चारित्र्यवानचं असले पाहीजे हा अट्टाहास अत्यंत बालिश आहे.

कारण नैतिकता ही काही राजकारण्यांचीच जबाबदारी नाही. नैतिकतेची व्याख्या व्यक्ति सापेक्ष व परिस्थिती सापेक्ष असते.

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा एक फोटो जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला. त्यावरही भरपुर चर्चा झाली. त्यानंतर त्या राजकीय नेत्याच्या व संबधित महिलेच्या जीवनात झालेल्या बदलांची आपण काळजी केली का?

आपल्याला त्याची काळजी करण्याचीही गरज नाही. आपल्याला फक्त चर्चा करायची आहे. खरे तर चार भिंती आडच्या खाजगी जीवनातील नाजुक क्षण सोशल मिडीयापर्यंत येतात कसे हा खरा प्रश्न आहे?

राजकारण्यांच्या खाजगी आयुष्यात खुप काही घडत असते. अनेक महिला राजकारण्यांच्या संपर्कात येवून आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडत असतात. अनेक महिला अनेक उद्योग करीत असतात. 

राजकारण्यांनी स्थितप्रज्ञ व्हावे आणि मोहाला बळी पडू नये, असा राजकिय नियम नक्कीच नाही. प्रत्येकाच्या जीवनात मोहाचा क्षण येतो, त्या निसरड्या मोहाच्या क्षणाला बळी एकट्याने पडता येत नाही. दोघेही जबाबदार असतात.

राजकारणात वावरणार्‍या नेत्यांच्या वजनाचा फायदा आपली जवळीक दाखवून काही महिला व चमचेगिरी हुजरे आपला स्वार्थ साधत असतात. याची नेत्यांनाही पूर्ण कल्पना असते.

काही नेते व महिला तर या अफाट कामगिरीच्या जोरावरच जगत आहेत. उजळमाथ्याने राजकीय व सामाजिक जीवनात वावरत आहेत. त्यांची ओळखच ‘ती’ आहे.

काही महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील एका नेत्याचे व्हीडीओ व्हायरल झाले होते. देशातील, राज्यातील व आपल्या लातूर जिल्ह्यातील अनेक सर्वपक्षीय नेत्यांचेही पराक्रम चर्चेत आहेत. त्यामुळे कोणीही पाक साफ नाही.

आपण सारे संधी मिळत नाही म्हणून ‘राम’ आहोत, नाहीतर संधी मिळताच ‘आसाराम’ आहोत, हे कटू असले तरी सत्य आहे.

समजा महेबुब शेख यांनी जे केले ते खरे आहे असे समजले तरी सारा दोष एकट्याचाच आहे असे म्हणून सरसकट बदनामी करणे योग्य नाही.

उच्चशिक्षीत पिडीतेला आपल्यावर होणार्‍या अन्यायाची जाणीव थोडी उशीरा झाली आहे. त्यामुळे पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर ‘गुन्हा सिध्द’ झाला तर नक्की कठोर कारवाई झालीच पाहीजे.

फक्त राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, आपले राजकारण साधण्यासाठी जर चौकात जमुन निदर्शने करण्यात येणार असतील तर अत्यंत घाणेरडे राजकारण केले जात आहे. जे आंदोलन करीत आहेत.

त्यांच्या पक्षातही अनेक रसिक नेते फेमस आहेत आणि त्यांच्या सत्यकथा जगाला ठावूक आहेत. ज्या महिला नेत्या ट्विट करुन पिडीतेसाठी न्याय मागत आहेत, त्यांनी महेबुब शेख यांच्याकडे एक बोटे केले असले तरी किमान आपल्याकडे वळणार्‍या तीन बोटांचे भान ठेवले तर त्यांचेच बनावटी न्यायदान फसवे असल्याचे लक्षात आले असते.

महेबुब शेख यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एवढी मजल मारायला अफाट कष्ट करावे लागतात. केवळ राजकारण म्हणून एखाद्या महिलेचे आरोप मान्य करुन सोशल मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीयातून गुन्हेगार ठरविणे, कार्यकर्त्याला राजकीय जीवनातून व आयुष्यातून उठवत असते.

महेबूब शेख यांच्या संपर्कात आलेल्या पिडीत महिलेने मोघम आरोप केले आहेत. पोलिसांनी मागच्या वर्षभरापासून महेबुब शेख व पिडीतेचा संपर्क नसल्याचे म्हटले आहे.

पोलिसांवर सरकार दबाव आणत असल्याचा आरोप होत असला तरी तपास पूर्ण होण्याची वाट पाहण्याची गरज आहे. बॉलिवूड मधले मीटू राजकारणात नवीन नाही. कोणत्याही क्षेत्रात हे नवीन राहीलेले नाही.

कधी राजीखुशीने तर कधी जबरदस्तीने असे गुन्हे घडत असतात. याची चर्चा कशी व कधी घडवून आणली जाते यावर सारे काही अवलंबून आहे. महेबुब शेख यांचा बचाव करणे, किंवा पिडीतेवर संशय घेणे हा हेतू मुळीच नाही. 

एकांगी झोडपणे बरोबर नाही, एवढेच सांगणे आहे. राजकारण, सिनेमा, क्रिडा, कार्पोरेट, फॅशन, माध्यमं, शिक्षण, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रात अशा घटना घडत असतात.

हे घडू नये असे आपल्याला कितीही वाटत असले. आपण कितीही रामअवतार धारण केला तरी काही क्षेत्रात तुमचा अवतार व मुखवटा गळुन पडत असतो.

ज्या इलेक्ट्रॉनिक मिडीयातून सध्या महेबुब शेख यांची मिडीया ट्रायल सुरु आहे. तिथे तरी किमान सारे काही आलबेल असल्याचे छातीवर हात ठेवून सांगावे.

माध्यमांएवढे तर शोषण कुठेच होत नाही, हे कडवट व पचायला जड असले तरी सत्य आहे. महेबुब शेख प्रकरणात जे सांगितले जात आहे, वास्तव त्यापेक्षा अधिक कुरुप किंवा वेगळे असण्याचीच शक्यता जास्त आहे.

अनेक माध्यमांतील महिलांनी राजकारण्यांच्या मदतीने अनेक कांड केले आहेत. महेबुब शेख यांच्याकडे आज एक बोट केले जात आहे, पण आपल्याकडे तीन बोटं आहेत याचे भान कोणालाही उरले नाही.

महेबुब शेख यांनी एखाद्या महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेतला असेल तर जरुर शिक्षा झालीच पाहीजे, किंबहुना अधिक कठोर झाली पाहीजे. याचा अर्थ समाजाने पोलिस व न्यायाधीश होवून गुन्हा जाहीर करुन शिक्षा सुनावू नये.

या प्रकरणातील पिडीत महिलेला जरुर न्याय मिळायला हवा, तिचा तो हक्क आहे. समाज म्हणून आपण तिच्या मागे उभे राहीले पाहीजे.

केवळ माध्यमातून आलेल्या बातम्या फॉरवर्ड करुन पिडीतेला न्याय मिळतो. विरोधकांनी ट्वीट करुन न्याय मिळतो असा भ्रम कोणीही बाळगु नये.

राजकारण्यांच्या खाजगी जीवनाचा जाहीर बाजार मांडला जात असेल. आपण त्याची केवळ मजा म्हणून आंबट चर्चा करण्यात धन्यता मानत असू तर आपल्याला प्रायव्हसी हवी म्हणायचा हक्क नाही.

महेबुब शेख यांची चुक असेल तर शिक्षा झाली पाहीजे, जर तपासात हे प्रकरण खोटे निघाले तर समाज म्हणून आपण याची एवढी चर्चा करणार का? हा खरा प्रश्न आहे.

महेबुब शेख यांचा हा गुन्हा गंभीर आहे. त्यांनी स्वतः नार्को तपासणीची तयारी दाखविली आहे. तपास व्हावा, सत्य बाहेर यावे ही मागणी केली आहे. या प्रकरणाचे सत्य बाहेर आलेच पाहीजे. 

कारण हे प्रकरण शेवटचे नाही, यापुढे घडणार नाही असे कोणी सांगु शकत नाही.आरोपातील सत्य बाहेर आले पाहीजे, प्रकरण खरे असेल तर पिडीतेला न्याय मिळायलाच हवा.

महेबुब शेख यांच्यासारखे राजकारणी समाजासाठी घातक आहेत. परंतु तपास पूर्ण होण्याआधी सुरु असलेलेल मिडीया व सोशल मिडीया ट्रायल समाजासाठी अत्यंत धोक्याचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here