मुंबई : राज्यात कोरोनाची रोजची आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर केली जाते. त्यावरून लक्षात येते की कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे की घटत आहे? या आकडेवारीवरूनच राज्यातील लॉकडाउबाबतचे निर्णय शिथिल किंवा कडक केले जातात.
मात्र अशातच कोरोनाच्या आकडेवारीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार आकडेवारी चुकीची सांगून संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप केला आहे.
मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे केले जात आहे.
त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे. हे प्रकार तत्काळ थांबवण्यात यावेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
कोविडसंदर्भातील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे.
या नियमावलीप्रमाणे कोविडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फक्त त्याला अपवाद अपघात, आत्महत्या, खून या कारणामुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रूग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचा रूग्ण यांचा आहे. केवळ असेच मृत्यू हे ‘अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू’ या रकान्यात नोंदवायचे आहेत, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने होतो आहे.
मुंबईसारख्या शहरात जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता किमान 1 लाख इतकी आहे. तेथे केवळ सरासरी 34,191 इतक्याच चाचण्या प्रतिदिन केल्या जात असल्याचे फडणवीस म्हणाले.