लातूर जिल्ह्यात विद्यार्थी आक्रमक : इयत्ता दहावी, बारावीचा अभ्यासक्रम 50 टक्क्यांनी कमी करा !

227
LATUR-STUDENT

लातूर : कोरोना रुग्णांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. असे असले तरी राज्यात दहावी, बारावी, एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जात आहे. 

राज्यातील सर्वच जिल्ह्यांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे बहुतांश सर्व जिल्ह्यांत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि दुसरीकडे राज्यात होऊ घातलेल्या परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्यात कोरोना संसर्ग नव्याने वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम 50 टक्क्यांनी कमी करावा तसेच, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा द्यावी ही मागणी जोर धरु लागली आहे. या मागण्यांना घेऊन लातूर विभागीय परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी आज जोरदार निदर्शने केली.

अभ्यासक्रम 50 टक्क्यांनी कमी करावा, विद्यार्थ्यांचे निवेदन

काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात येने ऐच्छिक करण्यात आले आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

विद्यार्थ्यांना विषयांचे आकलन किंवा अभ्यासास पुरेसा वेळ मिळालेला नाही, अशी भूमिका पालक आणि विद्यार्थ्यांनी मांडली आहे.

त्यामुळे दहावी आणि बारावी वर्गाचा अभ्यासक्रम 50 टक्क्यांनी कमी करावा अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी लातूर विभागीय परीक्षा मंडळाच्या कार्यालयासमोर आज जोरदार निदर्शने करण्यात आले.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडण्यास मुभा असावी

यावेळी निदर्शकांनी दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम 50 टक्क्यांनी कमी करावा अशी मागणी केली. तसेच सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक जिल्ह्यांनी खबरदारी म्हणून नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध घातले आहेत.

विद्यार्थ्यांना निर्बंध असल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर होऊ शकतो. याच कारणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीचे आणि जवळचे परीक्षाकेंद्र निवडण्याची सवलत द्यावी अशीही मागणी यावेळी निदर्शनकांनी केली आहे.

परीक्षा घेण्यासाठी येणाऱ्या पर्यवेक्षकांचं आधी लसीकरण करावं अशीसुद्धा मागणी आंदोलनकांनी केली आहे.या विविध मागण्यांसाठी आज विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा मंडळ अध्यक्षांना निवेदन दिले.

पालक व विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्यावर गंभीरपणे विचार करण्याची विनंती परीक्षा मंडळाच्या अध्यक्षांना केली. यंदा एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here