दहावी आणि बारावीची मुले परीक्षेसाठी पूर्ण तयारीत होती. कसून सराव झाला होता. आताच परीक्षा झाली असती तर अडचण नव्हती. मात्र परीक्षा लांबल्याने विद्यार्थी नाराज झाले आहेत.
परीक्षा लांबल्याने त्याचा अभ्यासावर, सरावावर परिणाम होऊ नये, याची आता नव्याने काळजी घ्यावी लागेल. कोरोना संकट मोठे असल्याने पर्याय नाही, अशा भावना शिक्षक, पालकांनी व्यक्त केली असली तरी अनेक पालकांनी परीक्षा काळजीपूर्वक घेता आली असती अशी प्रतिक्रिया मांडत आहेत.
दहावी आणि बारावीची एप्रिल महिन्यात सुरु होणारी परिक्षा आता लांबणीवर पडली आहे. ती मे आणि जूनमध्ये होणार आहे.
कोरोना संकट वाढत चालले असताना हा निर्णय अनिवार्य होता, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. येथे पालक, विद्यार्थी, शिक्षण संस्थांनी निर्णय योग्य असला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल का? या भीतीने चिंतातुर आहेत.
कोरोना संकटात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेच. मुलांची परीक्षांची मानसिकता तयार होती. त्यामुळे परीक्षा वेळेवर व्हाव्यात, अशी साधारण अपेक्षा होती. परंतू, संकट मोठे आहे.
शासनाला निर्णय घ्यावा लागला. या स्थितीत मुलांचे समुपदेशन करण्याची गरज आहे. अन्यथा त्यांच्यावर मानसिक दडपण येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला पाहिजे अशी भूमिका शिक्षक व पालक मांडत आहेत.
कारण विद्यार्थी परीक्षेच्या मूडमध्ये होती. परीक्षा लांबल्याने अडचणी वाढणार आहेत. आता पुन्हा नव्याने अभ्यासाला गती यायला वेळ लागेल.
जून-जुलैमध्ये परीक्षा होणार म्हणजे अभ्यासात ढिलाई येऊ शकते. कारण, आताच झालेल्या सराव परीक्षांतून चांगला अभ्यास झाला होता.
त्यावर परिणाम होऊ शकतो. पुन्हा नव्याने तयारी करावी लागेल, यामध्ये विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत.