मुंबई : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी भारतातील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. परंतु, ही गाडी तिथे कोणी ठेवली यासंदर्भात अद्याप कळू शकलेले नाही.
काही दिवसापूर्वी पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाची माहिती मिळाली होती. पोलीस मालकाचा शोध घेत होते, तेव्हा संशयित कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. स्फोटकं ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन असे त्यांचे नाव आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे.
मनसुख हिरेन काल रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबियांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी सभागृहात केली आहे.
ज्या गाडीत स्फोटकं होती, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात सांगितलं आहे की, माझी गाडी बंद पडली पण क्रॉफर्ड मार्केटला कामासाठी गेलो त्यावेळी ती गाडी गायब होती.
मनसुख हिरेन यांना सुरक्षा दिली पाहिजे ही मागणी सभागृहात काही वेळा पूर्वी केली होती, आणि आत्ता त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली.
या सगळ्या प्रकरणामध्ये गौडबंगाल आहे. त्यामुळे ही केस NIA कडे ट्रान्सफर झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.” मुकेश अंबानी यांच्यासारखे उद्योजक सुरक्षित नाहीत.
त्यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सोबतच या प्रकरणात त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. विधानसभेत बोलताना त्यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांचा घटनाक्रमासह अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर आरोप केले.