मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळत आहे.
याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत प्रश्न उपस्थित करताच काही वेळाने याप्रकरणातील तक्रारदाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतहेद मुंब्रा खाडीतून पोलिसांनी ताब्यात घेतलाय.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी संध्याकाळी 8 वाजल्याच्या आसपास मनसुख हिरेन दुकानातून घरी जाण्यासाठी बाहेर पडले. पण ते घरी परतले नाहीत. शुक्रवारी दुपारी त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलिसांमध्ये मनसुख हिरेन यांच्या गायब होण्याबाबत तक्रार केली.
पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर मुंब्रा खाडीत एक मृतदेह मिळाल्याचं समोर आलं. मृतदेहाचा फोटो मनसुख हिरेन यांच्याशी मिळताजूळता असल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यात हा मृतदेह मनसुख हिरेन यांचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ठाण्याच्या पोलीस परिमंडळ-1चे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बीबीसीशी बोलताना पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे म्हणाले, “मनसुख हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. सद्यस्थितीत काहीच माहिती देता येणार नाही. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहात आहोत.”
मनसुख हिरेन हे कालपासून बेपत्ता होते. त्याबद्दलची तक्रार आज सकाळी दाखल करण्यात आली होती. हिरेन यांचा मृतदेह आज (5 मार्च) सकाळी साडेदहाच्या सुमारास सापडला. याबाबतचं प्रसिद्धीपत्रक लवकरच सर्वांना दिलं जाईल, असंही ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
मुंबई पोलीस चौकशीसाठी सक्षम : गृहमंत्री
” जप्त करण्यात आलेली गाडी सॅम पीटर न्यूटन यांची होती. ती गाडी मनसुख हिरेन यांच्याकडे नुतनीकरणासाठी दिली होती. पण त्यांनी पैसे दिले नाही म्हणून मनसुख हिरेन यांनी ही गाडी स्वतःकडे ठेवून घेतली होती. मनसुख यांचा मृतदेह सापडलेला आहे. त्यांच्या शरीरावर कुठलेही घाव नाहीत. त्यांच्या मृतदेहाचं सध्या शवविच्छेदन सुरू आहे,” असं गृहमंत्री अनील देशमुख यांनी म्हटलंय.