नागपूर : भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने सतरावर्षीय मुलीसह तिच्या तीन महिला नातेवाइकांवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना पारडी भागात उघडकीस आली.
याप्रकरणी पारडी पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून मांत्रिकाला अटक केली आहे. धर्मेंद्र विठोबा निनावे ऊर्फ दुलेवाले (वय ५०, रा. अम्बेनगर, पारडी) असे अटकेतील मांत्रिकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शिक्षण घेत आहे. तिचे वडील खासगी काम करतात. धर्मेंद्र पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. १७ मे रोजी तो पीडित मुलीच्या घरी आला.
‘तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे. मोठे संकट येणार आहे. वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल’, अशी भीती दाखवली. पीडित मुलीचे वडील घाबरले. त्यांनी धर्मेंद्रला उपाय विचारला.
२१ दिवसांची पूजा करावी लागेल, असे धर्मेंद्रने मुलीच्या वडिलांना सांगितले. धर्मेंद्रने २१ दिवसांची पूजा केली. पूजा केल्यानंतरही भूतबाधा संपली नसून मुलीवर भुताचा अधिक प्रभाव असल्याचे त्याने पीडित मुलीच्या वडिलांना सांगितले.
भूत उतरविण्याच्या बहाण्याने तो मुलीला घेऊन निर्जनस्थळी गेला. तिच्यावर अत्याचार केला. तिला घेऊन तो घरी आला. पूजेच्या बहाण्याने त्याने मुलीसह आईवरही अत्याचार केला.
भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला पाच महिने घरी ठेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो दोघींना घेऊन डोंगरगड येथे गेला.
तेथील हॉटेलमध्ये दोघींवर अत्याचार केला. चंद्रपूर येथेही त्याने दोघींचा शारीरिक छळ केला. पीडित मुलीची मामी व आजीवरही त्याने अत्याचार केला. एक लाख रुपये खंडणी मागितली.
मांत्रिकाचे अत्याचार वाढत गेल्याने मुलीने नातेवाइकांसह पारडी पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी अत्याचार, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून धर्मेंद्रला अटक केली.