उत्तर प्रदेशमधील बदायू जिल्ह्यातील उघैती परिसरात 50 वर्षीय महिलेची सामूहिक बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
3 जानेवारी रोजी महिला मंदिरात पूजा करण्यासाठी गेली असता ही घटना घडली.मंदिरातील पुजारी आणि त्याच्या दोन साथीदारांवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे.
पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. पण मुख्य आरोपी पुजारीला पकडण्यात पोलिसांना आतापर्यंत यश आलेले नाही.
राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संकल्प शर्मा यांनी बीबीसीशी बोलतना सांगितले, “उघैती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 वर्षीय महिलेचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत आढळला होता.
पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारावर कलम 302 आणि 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटक केली आहे. तसंच या प्रकरणात प्राथमिक तपास करत असताना निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पोलीस ठाण्याच्या प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे.”
मंदिरातून घरी परतली नाही
महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी महिला मंदिरात पूजा करण्यासाठी गेली होती. पण बराच वेळ घरी परतली नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
महिलेच्या पतीने बीबीसीशी बोलताना सांगितले, “रात्री अकरा वाजता महात्मा (मंदिराचे पुजारी) गंभीर अवस्थेत महिलेला घरी घेऊन आले.
महिलेच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. रक्तस्त्राव जास्त झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. महात्मा सत्यनारायणसोबत वेदराम आणि ड्रायव्हर जसपाल होते.”
सुरुवातीला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली नाही असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.मंगळवारी (5 जानेवारी) पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला.
बुधवारी (6 जानेवारी) पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली. मुख्य आरोपी पुजारी सत्यनारायण फरार आहे.बदायूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.यशपाल यांनी मीडियाशी बोलताना पोस्टमॉर्टम अहवालाची माहिती दिली.
डॉ. यशपाल यांनी सांगितले, “पोस्टमॉर्टम अहवालानुसार महिलेच्या खासगी भागात जखमा आणि फ्रॅक्चर आहे. एका पायालाही फ्रॅक्चर आहे. शरीराच्या इतर भागांवरही जखमा आहेत.
यामुळे रक्तस्त्राव जास्त झाला आणि पीडित महिला शॉकमध्ये गेली. यात त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिकदृष्ट्या बलात्कार आहे असे दिसते कारण खासगी जागेवर जखमा आहेत. पुढील तपासानंतर अहवाल येईल आणि अधिक बाबी स्पष्ट होतील.”
उघैनी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सुरुवातीला याला अपघाताचे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी हत्या आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला.
पीडित महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रात्रीच पोलिसांना कळवले पण पोलीस दुसऱ्या दिवशी घटनास्थळी पोहचली.
आरोपीचा जबाब दिशाभूल करणारा
स्थानिक पत्रकार चितरंजन सिंह सांगतात मुख्य आरोपी मंदिराचे पुजारी सत्यनारायण दोन दिवस मीडियाला प्रतिक्रिया देत होते. पीडित महिलेचा मृत्यू विहिरीत पडल्याने झाला असा दावा त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना केला.
कुटुंबीय सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप करत असूनही पोलिसांनी पुजाऱ्याच्या माहितीच्या आधारावर सुरुवातीला कारवाई केली, अशी टीका करण्यात येतेय.
मीडियाशी बोलताना पुजाऱ्याने सांगितले होते, “महिला विहिरीत पडली होती. मी वेदराम आणि जसपाल यांना मदतीसाठी बोलवले.
त्यांच्या मदतीने महिलेला बाहेर काढले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आम्ही त्यांना घरी घेऊन गेलो.”
पोलिसांनीही पुजाऱ्याच्या या माहितीवर सुरुवातीला विश्वास ठेवला असा आरोप करण्यात येतोय. पुजारी सांगत असलेल्या विहिरीपर्यंत पोहचणे कठीण असल्याचे स्थानिक लोक सांगतात. त्यामुळे पीडित महिला विहिरीत पडल्याच्या शक्यतेवर कुणालाही विश्वास बसत नव्हता.