मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल, मे 2021 परीक्षेचे आयोजन करताना इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान तर बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान प्रचलित पद्धतीने व मंजूर आराखड्यानुसार आयोजित करण्यात आली आहे.
कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील दोन दिवसात बोर्डाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
इयत्ता दहावी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 12 एप्रिल ते 28 एप्रिल 2021 दरम्यान इयत्ता बारावी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 5 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. या अनुषंगाने उपरोक्त परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पाडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्यासोबत विविध समाज माध्यमं, प्रसारमाध्यमात इयत्ता दहावी, बारावी परीक्षे संदर्भात विविध बातम्या, अफवा प्रसारित होत आहेत.
त्यामुळे या परीक्षेत संबंधित घटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मंडळामार्फत सर्व संबंधित घटकांना आवाहन करण्यात आले आहे, अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये.
यासंदर्भात मंडळामार्फत वेळोवेळी पूर्वीप्रमाणे अधिकृत निवेदने मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे 2021 मधील लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा बाबत मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना दोन दिवसात निर्गमित करण्यात येत आहेत.
त्याचे काटेकोरपणे पालन करत सर्व विद्यार्थ्यांनी उपरोक्त परिक्षांना मुक्त वातावरणात सामोरे जावे, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
दहावी, बारावी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के होणार?
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 2020-21 या सत्रात फारच कमी कालावधीसाठी शाळांचे वर्ग भरले. आता 23 एप्रिल ते 21 मे बारावीच्या आणि 29 एप्रिल ते 20 दहावीच्या परीक्षा घेण्याचे ठरले. या परीक्षेचे नियोजन आणि स्वरुप ठरवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा नियोजन समितीची स्थापना केली आहे.
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मात्र अडचण होत आहे. प्रत्येक ठिकाणी कनेक्टिीव्हीटी मिळेलच, याचीही शाश्वती नसते. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकरता उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्क्यांवर आणावा.
ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण उपलब्ध झाले नाही, अशा विद्यार्थ्यांचा योग्य विचार करावा. दहावी, बारावीची परीक्षा संपेपर्यंत शैक्षणिक सत्र सुरु ठेवावे.
परीक्षा संपल्यानंतर पंधरा दिवसांनी गैरहजर विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घ्यावी. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35 टक्के गुण मिळण्याचा निकष आहे.
यंदा कोविडमुळे शिक्षणात अडथळा आला आहे. शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षणाची परिस्थितीही सगळेच जाणतात. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के करावा, अशी पालक व विद्यार्थांनी मागणी केली आहे.
दरम्यान राज्य परीक्षा नियोजन समिती दहावी-बारावीच्या उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के करण्याच्या शिफारशीवर गांभीर्याने विचार करत असल्याचे कळते.