विरार पश्चिमेला असलेल्या तिरूपती नगर भागामध्ये बंजारा हॉटेलच्या मागील बाजूस विजय वल्लभ रुणालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागली होती.
शुक्रवारी पहाटे 3.13 च्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत अतिदक्षता विभाग जळून खाक झाला असून, एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने या विभागातील 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या विभागातून 4 रुग्णांनी वेळीच पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला आहे.
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत.
आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ‘सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष द्या’ असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
तेव्हा ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, या ठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत
दुर्घटना घडणं क्लेशदायक : अजित पवार
राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली.
मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल त्यांनी सहसंवेदनाही व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्याने घेतली जाईल.
मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.