काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष आज जाहीर होण्याची ‘शक्यता’

200

मुंबई : बाळासाहेब थोरात यांचा ‘ना’ राजीनामा व त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी सुरु असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईत मंगळवारी रात्री उशीरापर्यंत काँग्रेसच्या गोटात खलबते सुरु होती.

महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या प्रमुख नेत्यांबरोबर बराचवेळ चर्चा केली.

या दीर्घ चर्चेनंतर बुधवारी काँग्रेस पक्षाकडून नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी मंगळवारी एच. के. पाटील यांनी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या तीन माजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या असल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा भार कमी करण्यात यावा, अशी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती.

मात्र, काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी तरुण नेत्याला संधी द्यावी. आम्ही त्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते.

प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव यांची नावे चर्चेत आहेत.

त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनुभवी नेत्यांना प्राधान्य?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला ‘महत्व’ देत नसल्याची चर्चा आहे.

आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे.

त्यासाठी आपला राजकीय अजेंडा रेटण्याची हातोटी असलेला ‘प्रदेशाध्यक्ष’ असावा अशी मागणी होऊ लागली आहे.

त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा.

यासाठी काँग्रेसकडून अनुभवी व वजनदार नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे.

त्यामुळे सुनील केदार, यशोमती ठाकूर यांची नावे मागे पडण्याची शक्यता आहे.

अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा होती, पण ते अनुत्सुक असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सातव, चव्हाण आणि पटोले यांच्यापैकी एका नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

नाना पटोलेंची शक्यता कमीच

प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले सुद्धा असले तरी त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस महाविकास आघाडीत सामिल झाल्यावर त्यांच्या वाट्याला काही मंत्रिपदं आली.

त्यावेळी मंत्रिपदं देताना ज्या नेत्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार नाही, अशा नेत्यांनाच मंत्रिपदं देण्यात आले.

नाना पटोले यांनाही विधानसभा अध्यक्षपद दिलं. त्यामुळे त्यांच्याकडील विधानसभेचं अध्यक्षपद काढून प्रदेशाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here