तर सेनेचा ‘गेम’ अटळ आहे | शरद पवारांशिवाय अजितदादा राजकारणात टिकूच शकत नाहीत !

515

२३ नोव्हेंबरला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी सरकार स्थापन केले आणि सकाळीच शपथविधी उरकला.

निवडणुकीच्या रिझल्ट पासून जी महिनाभर कोंडी झाली होती, तिला मोकळी करण्यात आली होती.

सेनेने १८० डिग्री टर्न घेऊन अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. त्यामुळे, सगळी गणिते फिसकटली होती.

अगदी त्याच वेळी कॉंग्रेस आणि सेनेशी बोलणी करणारे शरद पवार, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांशी देखील भेट घेतात.

मग, अजित दादा फुटल्याचे नाटक करून राष्ट्रवादीतील एक गट भाजपशी सलगी करून सत्ता स्थापन करतो.

मीडियामध्ये शरद पवार आणि अजीत पवार यांच्यात वितुष्ट आल्याच्या बातम्या पेरतात. महाराष्ट्रातील शेंबड पोरदेखील या बातम्यांवर विश्वास ठेवणार नाही.

शरद पवारांशिवाय अजितदादा राजकारणात टिकूच शकत नाही हे उघड सत्य सगळ्यांना माहित आहे.

याचा सरळ अर्थ आहे की शरद पवारांनी हिरवा झेंडा दिल्याशिवाय अजितदादा हे असलं पाऊल उचलणार नाही.

हे सगळ सुरळीत सुरु असतांना अचानकपणे शरद पवार अजितदादा आणि नव्या सरकारशी संबंध तोडून टाकतात आणि सरकार ३ दिवसातच बरखास्त होते.

सगळेजण आपापल्या परीने कयास लावत राहतात. पण, ते सरकार का पडलं?

याचं खरे कारण कुणालाच कळत नाही आणि कळणार देखील नाही. आपण ते डॉट कनेक्शनने समजू शकतो.

१. कोरोना सारखी महामारी २०१९-२०२० मध्ये येणार अशी चाहूल मोठ्या लेवलवर अगोदरपासूनच होती.

त्याच वेळी चीनमधील वूहान मध्ये कोरोनाचे पेशंट सापडायला सुरुवात झाली होती.

२. या महामारी दरम्यान खूप सारे लोक विरोधी निर्णय घ्यावे लागणार याची देखील कल्पना आली होती.

मग, भाजपच्या धुरिणांनी विचार केला असावा की अशा वेळी सरकार स्थापन करून उडत गाढव अंगावर का घ्या?

३. त्यातही महाराष्ट्र भाजपाचे नेते देवेंद्र फडवणीस म्हणजे भाजपचे ब्लू आईड बॉय, भाजपचे केंद्रातील भविष्य.

मग, भाजप नेत्यांनी फडवणीसांचे करीयर क्लीन ठेवण्यासाठी सरकार पाडण्याचा निर्णय घेतला असावा.

४. पण, सरकार तर स्थापन करावे लागणार. मग, भाजप आणि राष्ट्रवादींनी विचार केला असावा की सेना मुख्यमंत्री पदासाठी घुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली आहे.

आणि, उद्धव ठाकरेंना घोड्यावर चढवून मुख्यमंत्री बनवले गेले. अर्थात, उद्धव ठाकरेना येणाऱ्या संकटाची कल्पना नसावी.

त्यांना वाटले की त्यांचा विजय झाला. पण, मोदिजी आणि काकांनी त्यांना पुरते अडकवले.

५. या खेळात शरद पवार भाजप कडून खेळले ते दिसून येते.

कारण, भाजप सरकार पाडून सेना सरकार मधेही राष्ट्रवादीला फार मोठा गेन झाल्याचे दिसून येत नाही.

६. कोरोना काळातील कुठलेही निर्णय असोत, ते ठाकरेंच्या माथी मारल्याचे दिसून येते.

तिथे कॉंग्रेस-राष्ट्रवादीनी अगदी दुय्यम भूमिका घेतल्याचे दिसून येते.

त्यामुळे, जनतेच्या रोषाला फक्त उद्धव ठाकरे बळी पडल्याचे चित्र उभे राहिले असल्याचे सगळ्या महाराष्ट्राने पाहीले.

७. त्याचवेळी, राष्ट्रवादीच्या स्थापना दिवशी राष्ट्रवादीने १०० आमदार निवडून आणण्याचा पण केला.

सध्या राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहे, कॉंग्रेस ४४, भाजप १०५, आणि सेना ५७ आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला पण पूर्ण करण्यासठी अजून ५० आमदार हवेत.

आता हे आमदार उरलेल्या तीन पक्षांच्या जागा जिंकूनच मिळवता येणार. अर्थात आमदार खरेदी करून देखील मिळवता येईल पण आमदार खरेदी करणे तितकेसे सोपे नाही.

८. भाजप सध्या फॉर्मात असल्याने त्याचे आमदार फोडणे किंवा हरवणे कठीण आहे. कॉंग्रेसचे ४०-४५ आमदार fix असतात.

ते त्यांच्या कामगिरी मुळे नाही तर त्यांच्या पूर्वसुरींनी केलेल्या कामगिरीमुळे.

म्हणजे, एखाद्याने आपल्या वडिलोपार्जित मिळकतीवर बसून खावे तसले काही कॉंग्रेसचे नेते करत असतात.

त्यामुळे, कॉंग्रेसच्याही जागा राष्ट्रवादीला मिळणे अशक्यच.

९. मग, राहिला पक्ष तो शिवसेना. शिवसेना पक्ष खरेतर मुंबईसाठी बनवला होता. मुंबईतून कॉमुनिस्ट पक्षाचा रस्त्यावर उतरून काटा काढण्यासाठी कॉंग्रेसने शिवसेना पक्षाची निर्मिती केली होती.

आपले काम फत्ते झाल्यावर बाळासाहेब ठाकरेनी पक्षाला विविध दिशेला वळवण्यात यश मिळवल होत. पण, बाळासाहेब गेल्यावर शिवसेना पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी अडचणीचा ठरू लागला होता.

त्यामुळे, जागा वाढवायच्या असेल तर सेनेच्या जागा जिंकणे हाच राष्ट्रवादीच्या दृष्टीने सोपा मार्ग आहे.

सेना संपली तर भाजपला आनंदच आहे. कारण, दोन्हीचा मतदार हिंदुत्वावर मत देणारा आहे.

१०. त्यामुळे, भाजप सेनेने कसे हिंदुत्व सोडले त्यावर प्रचार करत आहे तर सेना कशी सेक्युलर आहे.

तेच राष्ट्रवादीचे नेते दाखवत आहे. अशा रीतीने सेनेचे भाग करण्याची खेळी सध्या खेळली जात आहे.

११. उद्धव ठाकरेना हे राजकारण जरा उशिरा कळल्यामुळे, ते संजय राऊतच्या आडून सरकार पाडा असे सुचवत आहे.

पण, कोरोना अजून संपुष्टात आला नसल्याने भाजप सरकार पाडू इच्छित नाही. आणि, शक्य होईल तितकी सेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न करत आहे.

१२. सुशांत सिंग केसमध्ये आदित्य ठाकरेचे नाव येणे आणि त्यावर मोठठा धुराळा उडणे हा देखील त्याच राजकारणाचा भाग आहे.

अर्थात, आदित्य दोषी असला किंवा नसला तरी त्याला काहीही होणार नाही हे सगळ्यानाच माहित आहे.

पण, जसे किणी प्रकरणात राज ठाकरेचे करियर संपले तसेच या प्रकरणात आदित्यचा गेम केला आहे.

एकंदरीत पाहता सरकार स्थापन करून सेना नेगेतीव्ह मध्ये गेल्याचे चित्र दिसत आहे.

त्यात औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे अशी जुनीच मागणी नव्याने उभी राहिली आहे.

यात पुन्हा सेनेचा गेम पक्का आहे. कारण, सेना जरी नामकरण प्रयत्न करेल, त्याला राष्ट्रवादी, कॉंग्रेस साथ देणार नाही. यात, सेना पुरती फसल्याचे दिसते आहे.

नामकरण मुद्दा जरी सेनेला घेरण्यासाठी उकरला असला तरी हाच मुद्दा सेनेला वाचवू शकतो.

सेनेने नामकरण मुद्दा लावून धरावा. विधानसभेत, औरंगाबाद मनपात हा प्रस्ताव मांडावा.

अर्थात राष्ट्रवादी, कॉंग्रेस विरोध करतील. त्यावर हे सरकार पाडून टाकावे आणि भाजपला सरकार स्थापन करू द्यावे.

हे नामांतराचे घोंगडे त्यांच्या गळ्यात टाकून द्यावे. मागचा अनुभव बघता भाजप देखील नामांतर करणार नाही.

या मुद्द्यावर आपली प्रतिमा पुन्हा उजळवून घ्यावी आणि आपला पक्ष वाचवावा.

बाळासाहेब ठाकरेंनी भविष्यातील गुंतवणूक म्हणून हा मुद्दा सेनेसाठी ठेवला आहे. आता जर त्याला कॅश केले नाही तर सेनेचा गेम अटळ आहे.

जयतु भारतम् || वंदेमातरम् ||

नंदलाल गवळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here