कोरोना काळातील चालू शैक्षणिक वर्षात आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनच अभ्यास करावा लागणार आहे.
बहुसंख्य शाळांनी सहामाही परीक्षेसह पहिली आणि आता दुसरी घटक चाचणी परीक्षांचे आयोजन केले आहे.
त्यानुसार शाळेत न जाता विद्यार्थी घरूनच ऑनलाईन पद्धतीने वार्षिक परीक्षाही देतील, अशी शक्यता आहे.
आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याविषयी तसेच या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा घेण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने येणाऱया नव्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच जूनमध्ये शाळेची घंटा वाजण्याची शक्यता आहे.
पहिल्या सत्रात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा घेण्याविषयी शालेय शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना शाळांना मिळालेल्या नाहीत.
शैक्षणिक सत्राचे दिवस वाढवण्याची मागणी
कोरोना काळात अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत. त्या-त्या वर्गातील विषयांच्या मूळ संकल्पना विद्यार्थ्यांना अवगत असणे गरजेचे आहे.
त्यामुळे भविष्यात शाळा सुरू करताना शैक्षणिक सत्र दहा महिन्यांऐवजी बारा महिने करून पहिल्या सहामाहीत सध्याच्या इयत्तेचा व नंतरच्या सहामाहीत पुढील इयत्तेचा अभ्यास आणि परीक्षा घेण्याचे नियोजन करावे, अशी शिक्षक संघटनांनी असे म्हटले आहे.
तीन महिने तरी शाळा सुरू करा!
शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी त्यांचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.
येत्या काही काळात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली तर मार्चपासून पुढील तीन महिने शाळा सुरू करावी, असे विनाअनुदानित शाळा कृती समितीचे सचिव प्रशांत रेडीज म्हणाले.
आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व परीक्षा घेण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. या विषयावर निर्णय प्रक्रिया सुरू असून लवकरच शाळांना सूचना दिल्या जातील.
– विकास गरड, सहसंचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद