बीड : जिल्ह्यात मागील 24 तासात महिला अत्याचाराच्या तीन घटना घडल्या आहेत. शिरूर तालुक्यातील मारुतीची पांगरी येथे २२ वर्षीय विवाहितेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली म्हणून आरोपीने तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार केला, तर दुसरीकडे केज तालुक्यातील एका गरोदर विवाहितेचे अपहरण करून सातारा जिल्ह्यात तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली.
या प्रकरणी केज न्यायालयाने दाेन आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आणि तिसरी अत्याचाराची घटना भाटवडगावात (ता. माजलगाव) उघडकीस आली. १८ वर्षीय गतिमंद मुलीवर गावातील एका विवाहित पुरुषाने जीवे मारण्याची धमकी देत दोन महिन्यांपासून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला गतिमंद मुलीची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या माजलगाव ग्रामीण पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी खडसावताच पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री बलात्काराचा गुन्हा नोंदवला.
ठाण्यात तक्रार का दिली म्हणून महिलेवर अत्याचार
शिरूर | तालुक्यातील एका विवाहितेचे तिच्या पतीसोबत पटत नसल्याने ती माहेरी मारोतीची पांगरी येथे आई वडिलांसह राहत होती. तिच्या ओळखीच्या गावातील नागेश वारे याने तिला फोन करून ‘तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझ्या आई वडिलांना मी मारून टाकेन’ अशी धमकी देऊन सातत्याने तो फोन करत होता. २८ एप्रिल २०२१ रोजी नागेशने पांगरी येथे विवाहितेच्या माहेरच्या घरी जावून तिचा विनयभंग केला होता.
या प्रकारानंतर विवाहितेने अंमळनेर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नागेश वारेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला होता. जामीनावर सुटलेल्या नागेशने पुन्हा विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे विवाहिता १६ मे २०२१ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्यासाठी गेली होती.
जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन ती सायंकाळी शिरूर कासार येथील पेट्रोल पंपासमोर आली असता तिथे नागेश वारे हा त्याच्या मित्रासह दुचाकीवरून आला. विवाहितेचे तोंड रुमालाने दाबून तिला कापरी ओढ्याच्या पुलाखाली नेऊन आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
आरोपीच्या अत्याचारातून गतिमंद मुलगी गर्भवती
माजलगाव | १८ वर्षीय गतिमंद तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेत भाटवडगाव येथील अन्सार खान गफूरखान (३७ ) याने तिला लग्नाचे आमिष दाखवत दोन महिन्यांपासून अत्याचार केला होता. अचानक तिची प्रकृती खालावल्याने आई वडिलांनी तिला खासगी डॉक्टरांकडे दाखवले.
तेव्हा ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. आरोपी अन्सारने तिच्या बराेबर लग्न झाल्याचे सर्टीफिकेट तयार करून निकाह नामाही तयार करून घेतला होता. परंतु, तो तिला जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. शेवटी मुलीच्या वडिलाने तिच्यासह माजलगाव ग्रामीण पोलिसांत धाव घेतली. परंतु, पोलिसांनी या प्रकरणी तक्रार घेतली नव्हती.
गरोदर महिलेवर बलात्कारप्रकरणी दोन जणांना सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी
केज | बंडू राजाभाऊ चौरे (रा. जिवाची वाडी) व सहदेव आश्रुबा आंधळे (रा. आंधळेवाडी ) यांनी १९ वर्षीय गरोदर महिलेचे एका गावातून जिवे मारण्याची धमकी देत १ मे २०२१ रोजी बळजबरीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. तिला सातारा जिल्ह्यातील मल्हार पेठ येथे नेऊन एका खोलीत डांबले होते. ती गरोदर असतानाही आरोपी बंडू चौरेने तिच्यावर अत्याचार केला होता.
दि. ३ मे २०२१ रोजी विवाहितेच्या पतीच्या तक्रारीवरून केज पोलिसांत सुरुवातीला मिसिंगची तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी जमादार दिनकर पुरी यांनी पीडितेचे मोबाइल लोकेशन तपासून तपास चक्रे फिरवली तेव्हा विवाहिता सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ (ता. कराड) येथे असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर जमादार पुरी व पो.कॉ. अनिल मंदे यांनी रविवारी मल्हारपेठेते जाऊन खोलीवर छापा मारून पीडित महिलेची सुुटका करत आरोपींना अटक केली. पीडितेच्या तक्रारीवरून बंडू चौरे, सहदेव आंधळे यांच्याविरुद्ध केज ठाण्यात बलात्कार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सोमवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत तपास करत आहेत.
हेमा पिंपळेंची मध्यस्थी, पोलिस अधीक्षकांना सांगितला प्रकार
माजलगाव ग्रामीण पोलिस गतिमंद मुलीची तक्रार घेत नसल्याने भाटवडगावचे संरपच, काही ग्रामस्थ व मुलीचे वडील यांनी बीड येथे येऊन अॅड. पिंपळे यांची भेट घेतली. त्यानंतर अॅड. हेमा पिंपळेंनी एसपींंची भेट घेतल्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलिसांचे कान टाेचताच पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा आरोपी अन्सार खान गफुर खान पठाण (रा.भाटवडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.