तीन महिन्यांच्या बाळाला बेवारस ठेवून महिलेचे पलायन | पोलिसांनी तीन तासात आईला शोधले

169

बुलढाणा : “माता न तू वैरिणी!” या उक्तिप्रमाणे एका महिलेने आपल्या तीन महिन्यांची चिमुकलीला मध्यरात्री अगदी गोठवणाऱ्या थंडीत बेवारस सोडून पळ काढला.

मात्र पोलिसांच्या सतर्कतेने या महिलेचा तीन तासात शोध घेत बेवारस बाळाला आपली आई मिळवून दिली. या घटनेने बुलढाणा जिल्हा मात्र सुन्न झाला आहे.

मेहकर तालुक्यातील डोनगाव पोलिसांच्या हद्दीतील पांगरखेड गावात एका घरासमोर संबंधित महिला आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला सोडून गेली. ही बाब सकाळी लक्षात आल्यावर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतलं आणि तपास सुरु केला. पुण्यात कामाला असलेलं आणि प्रेमविवाह केलेलं दाम्पत्य आपल्या गावी जात असताना, रस्त्यात दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

यामुळे बाळ बेवारस सोडल्याचं महिलेने सांगितलं. पोलिसांनी या बाळाची आई सुवर्णा आणि वडील पवन टाकतोडे यांना केवळ तीन तासात शोधून त्यांच्याकडे बाळ सोपवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाळाचा पिता पवन हरिदास टाकतोडे हा मूळचा वाशिम जिल्ह्यातला आहे. एक वर्षापूर्वी म्हणजे 25 डिसेंबर 2019 रोजी त्याने अकोल्यातील मूर्तिजापूरमधल्या सुवर्णा बावनेसोबत प्रेमविवाह केला.

दोघेही पाच वर्षांपासून पुण्यातील नाना पेठेत कामाला होते. तिथेच त्यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत मग प्रेमात झाला. दोघांनी सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या.

त्यानंतर 25 डिसेंबर 2019 रोजी लग्न केलं. 19 सप्टेंबर 2020 रोजी सुवर्णाने मुलीला जन्म दिला. शिवन्या असं लेकीचं नावही ठेवले.

मुलगी झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी दोघेही मोटरसायकलने पुण्याहून वाशिममधील आपल्या गावी येत होते.

यावेळी रस्त्यातच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रात्र झाल्याने दोघेही मेहकर इथे तीन तास थांबून निघाले असता पांगरखेडजवळ त्यांच भांडण वाढले.

त्यानंतर पवनने रागात येऊन सुवर्णा आणि बाळाला तिथेच सोडून मोटरसायकल घेऊन पळ काढला. मग सुवर्णाने पुढील कुठलाही विचार न करता जवळ दिसलेल्या घरासमोर मध्यरात्री आपल्या बाळाला गोठवणाऱ्या थंडीत बेवारस सोडून पवनचा पाठलाग करण्यासाठी पळत निघाली. रात्रभर बाळ थंडीत कुडकुडत राहिलं.

कडाक्याच्या थंडीत तीन महिन्यांच्या बाळाला बेवारस ठेवून महिलेचा पळ, पोलिसांनी तीन तासात आईला शोधलं!

सकाळी गावातील लोक उठल्यावर त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ बाळाच्या आई-वडिलांचा शोध तीन तासात घेऊन बाळाला त्यांच्या स्वाधीन केलं आहे. डोनगाव पोलिसांच्या तात्काळ घेतलेल्या पावलामुळे आज या बाळाला आईवडील मिळाले. पण या घटनेने पोलिसांसह सर्वांचे मन हेलावून निघाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here