नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले जयंती ते डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्यंत टिका उत्सव साजरा करण्याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी एक पत्र लिहिले आहे. पंतप्रधान कार्यालयाने हे पत्र ट्विट केले आहे. आपल्या पत्रात मोदी म्हणाले की लसीकरण महोत्सव म्हणजे कोरोनाविरूद्धच्या दुसर्या युद्धाची सुरुवात होती.
लसीकरण उत्सव कोरोनाविरुद्धचं दुसरं युद्ध
नरेंद्र मोदी यांनी लसीकरण उत्सव हे कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या युद्धाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. यामध्ये आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेवर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान कार्यालयाचं ट्विट
ज्येष्ठ नागरिकांची मदत करा
पंतप्रधान मोदी यांनी Each One- Vaccinate One याअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांचे शिक्षण झालेले नाही त्यांची मदत करा, असे आवाहन केलं आहे.
कोरोनावरील उपचारात मदत
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींना उपचारांसाठी मदत करा. कोरोना विरुद्धच्या लढ्यात ज्यांच्याकडे साधन उपलब्ध नाहीत, त्यांना साधनं उपलब्ध करुन द्या.
मास्कचा वापर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मास्क घालण्याचं आवाहन केले आहे. मास्क वापरुन स्वत:चे आणि इतरांचे संरक्षण करा, असेही मोदी म्हणाले आहेत.
जनतेने नेतृत्व करावे
एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यास जनतेने सूक्ष्म कंटेनमेंट झोन लागू करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. जिथे एखादा व्यक्ती कोरोनाबाधित आढळेल, तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन बनवण्यात यावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.
टेस्टिंग आवश्यक
एक रुग्ण आढळल्यास सूक्ष्म प्रतिबंधित विभाग जाहीर केल्यानंतर इतर नागरिकांनी टेस्टिंगवर भर द्यावा, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
लस वाया जाऊ देऊ नका
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आणि लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचा एकही डोस वाया जाऊ देऊ नका, असे आवाहन केले आहे.
आपल्याला झिरो वॅक्सिन वेस्टेजपर्यंत पोहोचायचं आहे, असे मोदी म्हणाले. ज्यांना लसीची आवश्यकता आहे त्यांना लस दिली जावी, असेही ते म्हणाले.
लसीकरणाची क्षमता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची लसीकरणाची क्षमता वाढवून लसीचा ऑप्टिमम युटिलायझेशन वाढवायचे आहे, असे मोदी म्हणाले.
गरज नसताना घराबाहेर पडू नका
देशातील नागरिकांनी ज्यावेळी काम असेल त्यावेळी घराबाहेर पडावे, असं आवाहन केले आहे. ज्यावेळी गरज नसेल त्यावेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असे नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सांगितलं आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होऊ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या चार दिवसांमध्ये आपण वैयक्तिक पातळीवर, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर कोरोना रोखण्यासाठी स्वत: ध्येय निश्चित करु आणि पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रित करण्यामध्ये यशस्वी होऊ, असे नरेंद्र मोदी म्हणाले.