आपल्या पतीचे लग्नानंतरही इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजल्यानंतर तिने नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध केला. तसेच तिने अनेकदा नवऱ्याला याबाबत समजावले होते.
या विषयावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण होत होते. ‘मी एकाच नाही, दहा महिलांशी संबंध ठेवणार, तू मला अडवणारी कोण’ असे सांगत पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत राहणाऱ्या मोहसीनचे लग्न शेगावमधील पीडितेसोबत दीड वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंतरही पतीचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे आपल्याला समजले.
आपण त्या संबंधांना विरोध करत त्याला समजावले. त्यानंतरही त्याच्या वागण्यात काहीही सुधारणा होत नव्हती. पतीच्या अशा वागण्याने त्रस्त झालेल्या महिलेने त्याच्या अनैतिक संबंधांबाबत माहेरच्यांना सांगितले.
तिने माहेरच्यांना ही गोष्ट सांगितल्याचे समजताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानंतर 22 नोव्हेंबरला त्याने पीडितेला मारहाण केली. त्यानंतरही त्यांच्यात यावरून वाद सुरू होते.
यावरून वाद झाला असता ‘ मी एक नाही, दहा महिलांशी संबंध ठेवणार, तू मला विचारणारी कोण’ असे तो म्हणाला. त्यानंतर तलाक…तलाक…तलाक…असे म्हणत त्याने तिला तिहेरी तलाक दिला.
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार महिलेच्या पतीविरोधात आणि त्याच्या आईवडिलांविरोधात नवीन तिहेरी तलाक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.