नाशिक : सावत्र आई व वडिलांनीनी आपल्या लहान मुलांना अमानुष मारहाण केल्याची अमानुष व संतापजनक घटना नाशिकच्या इगतपुरी येथे घडली आहे.
या प्रकरणातील वडील स्वतः रेल्वे पोलीस कर्मचारी आहेत. आईच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या चिमुक्याना वडील आणि सावत्र आईकडून दररोज छळ असल्याची माहिती मुलांच्या मामाने दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मुलांच्या वडीलांना आणि सावत्र आईला अटक केली आहे. तर मुलांवर सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शहरात ही घटना घडली. या घटनेतील आरोपी राहुल मोरे हे स्वतः रेल्वे पोलीस कर्मचारी आहेत.
ते आपली दुसरी पत्नी आणि पहिल्या पत्नीच्या दोन मुलांसोबत राहतात. दोन्ही मुलं लहान असून एक 5 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षांचा मुलगा आहे.
या दोन्ही मुलांचा दोघेही आई-वडील छळ करतात. त्यांना चटके देतात. तसेच त्यांना मारहाणही करतात. दोन्ही मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तिथे गोळा झाले आणि त्यांनी घडलेला प्रकार मुलांच्या मामाला कळवला.
मुलांचा मामा सूरतहून याठिकाणी दाखल झाला. त्यानंतर त्याने मुलांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
त्यानंतर मुलांच्या आजीने मुलांचे वडील आणि सावत्र आईविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी आता मुलांची वडील राहुल मोरे आणि मुलांच्या सावत्र आईला अटक करण्यात आली आहे.
त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मुलांचा छळ करत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुलांना खूप मारहाण केली असून मुलं बोलूही शकत नाहीत.
या संपूर्ण घटनेनंतर सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच याप्रकरणी मुलांचे वडील आणि सावत्र आई यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.