उदगीरच्या भाजीपाला मार्केटमध्ये दुकानदारांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

265
CRIME news

उदगीर : येथील भाजी मार्केटमध्ये असलेल्या दुकानदारांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. 

यात चाकू, दगड, टिकावाच्या दांड्याने एकमेकांवर हल्ला केल्याने दोन्ही गटांतील सातजण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाचजणांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी सांगितले, मिर्झा नोमान सरदार बेग (रा. कासीमपुरा) याच्या फिर्यादीवरून आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाच्या कारणावरून फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांना जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू, दगड, टिकावाच्या दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी आठजणांविरुद्ध कलम ३०७, ३२६, ३२३, १४३, १४७, १४९, ५०६, ५०४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर अल्ताफ खुर्शीद बेग (रा. किलागल्ली) यांच्या फिर्यादीवरून रस्त्यावर ठेवलेले कोंबडे कोंडण्याची जाळी काढून घेण्याच्या कारणावरून आठजणांनी सत्तूर, दगड, लाकडाने मारून पाय फॅक्चर केला अशा आशयाची फिर्याद दिली आहे.

परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील करीत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव शहरात दाखल झाले. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here