मुंबई : आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवले आहे.
तसेच कोणत्याही गोष्टीवर टीका करण्यात भाजपचे काही लोक आघाडीवर असून त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
याचबरोबर आमचा एकही आमदार फुटणार नाही असा विश्वास विरोधी पक्षाला असला तरी राज्यात तीन पक्ष एकत्र आल्याने येत्या काळात एकाच पक्षातून पक्षांतर होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला.
राऊत यांच्या या विधानावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही,’ अशा शब्दात राणे यांनी समाचार घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
उद्धव ठाकरे आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही, कुबड्यांवर सरकार चालवतोय, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाही, हा माणूस जर P
M झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं लावेल हा माणूस .. असे राणे म्हणाले.
राजकीय भूकंप झाल्यास नवल नाही
राजकारणात आमचा माणूस फुटणार नाही, असं बोलायच असत. त्यामुळेच विरोधक तसे बोलत आहेत, असे सांगतानाच विरोधी पक्षामध्ये मूळचे कमी आणि बाहेरचे लोक जास्त आहेत.
त्यामुळेच या बाहेरच्या लोकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांचीही अस्वस्थता पाहता उद्या जर आम्ही काहीही न करता राजकीय भूकंप झाला तर त्याचे नवल वाटणार नाही, असेही राऊत म्हणाले.