उद्धवजी, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

183

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना मेट्रो कारशेडबद्दल भाष्य केलं होतं. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ‘अजब व अफलातून’ सल्ला दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एक पोस्ट ट्विट करत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधानांना भेटण्याचा सल्ला दिला आहे.

“टीम इंडिया असं समजून काम करा उद्धवजी… आताही वेळ आहे. आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते.

सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे ८० टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. तुम्ही सुरूवातीपासूनच याला इगोचा विषय बनविला.

जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते.

तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता. पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे.

ते जनतेला भ्रमात पाडणारे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता.

एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला आहे,” असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.

फडणवीसांनीही केली विनंती

देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात विनंती केली आहे. “प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे.

ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला?

बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ ८०%पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार!

मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे!,” असं आवाहन फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here