अंबाजोगाई : उदगीर-औरंगाबाद या मार्गावर चालक गाडी व्यवस्थित चालवत नसल्याने शिवाय अंबाजोगाई-नेकनूर दरम्यान अनेकवेळा बस अपघातग्रस्त होण्यापासून वाचली.
तेव्हा प्रवाशांनी त्याला नेकनूर बस स्थानकात रोखताच चालकाने कंट्रोल पॉईंटला जाण्याऐवजी पळ काढला. याप्रकरणाने उदगीर-औरंगाबाद प्रवाशांना मनस्तापाला समोरे जावे लागले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उदगीर आगाराची उदगीर-औरंगाबाद ही बस औरंगाबादकडे जात होती.
तेव्हा चालकाने अंबाजोगाई येथेच वीस मिनिटे उशीर केला. यानंतर पुढील प्रवासात अनेक ठीकाणी बस अपघात होण्यापासून वाचली.
तर चालकाचे केजमध्ये एका रिक्षा चालकासोबत भांडण झाल्यामुळे बसमधील प्रवाशांना चालकाने मद्यप्राशन केल्याचे जाणवले. त्यानंतर नेकनूरमध्ये बस येताच प्रवाशांनी ती कंट्रोल पॉईंटकडे वळवली.
आता प्रवाशी कंट्रोल पॉईंटकडे जाणार व आपल्याला पुढील कारवाईला तोंड द्यावे लागणार याची चाहूल लागताच चालक बस आणि प्रवाशांना सोडून पळून गेला.
या बसमधील प्रवाशांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या बसमध्ये कंट्रोलने व्यवस्था करत त्या चालकाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बसमधील प्रवाशांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला.