नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. मोदी सरकार २.० मध्ये मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही.
अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे प्रभारी म्हणून अधिक खाती आहेत. त्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्या कमी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील विधानसभा निवडणुकीपासून राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेने भाजप सोडून कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली.
यासाठी शिवसेनेने केंद्रीय मंत्रीपदावर पाणी सोडले. शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलानेही भाजपची साथ सोडली. परिणामी, दोन मंत्री पदे रिक्त झाली.
त्यामुळे महाराष्ट्राला मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाची जागा कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. या पदासाठी राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
नारायण राणे यांना तातडीने दिल्लीहून बोलावण्यात आले असल्याची माहिती एबीपी माझा न्यूज चॅनेलने दिली आहे. त्यामुळे राणे उद्या दिल्लीला रवाना होतील.
नारायण राणे दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतील. नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला वारंवार कोंडीत पकडून झोडपून काढले आहे.
त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राणे यांनी या विषयावर खूप काम केले होते.
आताही या विषयावर ते राज्य सरकारवर जोरदार टीका करीत आहेत. याशिवाय पुढील वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर राणेंना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्रीपदासाठी राणेंबरोबर रणजित नाईक निंबाळकर आणि हिना गावित यांचीही नावे चर्चेत आहेत.
हे देखील वाचा
- मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून फक्त एकाला संधी मिळणार? कोणाची संधी हुकणार?
- विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असल्याने पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे अध्यक्ष होतील? संजय राऊतांचे भाकीत
- विद्यार्थिनीचे आपल्या शिक्षकावरच प्रेम जडले; तिने थेट त्याच्यासाठी घरदार सोडले