चमोली (उत्तराखंड) : चमोली जिल्ह्यातील रेणी गावाजवळ हा हिमकडा कोसळला असून आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.
या जलप्रलयात अनेक ग्रामस्थांची घर वाहून गेली आहेत. धोली नदीला यामुळे मोठा पूर आला आहे. यामुळे या नदीवरील ऋषी गंगा प्रकल्पाचं मोठ नुकसान झालं आहे.
या प्रकल्पात काम करणाऱ्या सुमारे ४० ते ५० बेपत्ता मजूरांना शोधण्यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. आयटीबीपीचे १०० पेक्षा अधिक जवान या मजुरांच्या बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून एनडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. हा हिमकडा चमोली येथून हृषिकेशपर्यंत पोहचणार आहे त्यामुळे जोशीमठ, श्रीनगरपर्यंत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
गंगेकाठी हाय अलर्ट
यासाठी उत्तराखंड सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार तातडीने कामाला लागले आहे. स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून नदीकाठची गावे रिकामी करण्यात येत आहेत. चमोलीपासून हरिद्वारपर्यंत अनेक गांवात पाणी घुसण्याची शक्यता आहे.
अनेक लोक गाळात अडकले
हिमकडा तुटल्यानंतर ऋषीगंगा आणि धौलीगंगा नद्यांवरील वीजप्रकल्पातील पाणी प्रचंड वेगाने पुढे जात आहे. या जलप्रलयात अनेक लोक वाहून गेले आहेत. चमोलीतील अनेक घरे गाळात गेली असून यात २०० हून अधिक लोक गाडले गेल्याची शक्यता आहे.
जोरदार बर्फवृष्टीचा चमोली जिल्हा
उत्तराखंडमधील चमोली जिल्हा हिमालयाच्या रागांमध्ये ओली नावाने ओळखले जाते. सुमद्रसपाटीलपासून २५०० मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. जेथे हिमकडा तुटला त्या जोशीमठाजवळून रोप वेने अनेक पर्यंक चमोलीला जातात.
येथून नंदादेवी, कमेट आणि दुनागिरी सारख्या महाकाय पर्वत नजरेत भरतात. या पर्वतांवर फेब्रुवारी अखेर जवळपास १२ फुटांचा थर जमा होतो. त्यामुळे येथे स्कीइंग साठी ही जागा सुरक्षित मानली जाते. त्यामुळे येथे स्कीइंगी महोत्सवही आयोजित केला जातो. तसेच येथे स्नोबॉलच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात.
जोशीमठ महत्त्वाचे पर्यटनस्थळ
जोशीमठ हा चमोली येथे हिंदूंचे प्रसिद्ध ज्योतिष पीठ आहे. आठव्या शतकात शंकराचार्यांनी याची स्थापना केल्याचे बोलले जाते. बद्रीनाथ आणि देशातील अन्य तीन मठांच्या स्थापनेपूर्वी पहिल्यांदा येथे मठाची स्थापना केली. बद्रीनाथ, ओली आणि नीती घाट यामुळे जोशीमठ हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे.