चंद्रकांत पाटलांच्या गावातील विजय शिवसेनेसाठी अगदी ‘खास’

225

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भुदरगड तालुक्यातील खानापूर गावात शिवसेनेने बाजी मारली. त्यानंतर मात्र सेना व भाजपा आमने सामने येऊन मनसोक्त टीका करीत आहेत. 

विशेष म्हणजे या गावात भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली होती. तरीही पराभव झाल्याने सेना आक्रमक झाली आहे.

या विजयाबद्दल आमदार प्रकाश आबीटकर यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास संदेश पाठवून अभिनंदन केले आहे. खानापूर या गावात पाच वर्षे भाजपची सत्ता होती.

यावेळी मात्र शिवसेनेने जोरदार तयारी करत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्याला रोखण्यासाठी भाजपने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबरच आघाडी केली.

यामुळे आमदार पाटील यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत शिवसेनेने विजयाचा गुलाल लावला.

या निवडणुकीत भाजपाने कॉंग्रेस व राष्ट्रवादी बरोबर मोट बांधली होती. यामुळे या आघाडीची चर्चा राज्यभर झाली व निकालाची उत्सुकताही वाढली.

आज निकाल लागले तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या गावात शिवसेनेने मुसंडी मारल्याचे दिसून आले. आमदार आबीटकर यांनी यामध्ये विशेष परिश्रम घेतले.

खानापूरमध्ये नऊ पैकी सहा जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे तर, विरोधी आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि काँग्रेसला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या गावातच भाजपला एकही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक निकालांत ही सर्वांत मोठी बातमी ठरली आहे.

या निकालानंतर ‘एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे तर महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्रात भाजपच पुढे आहे’, अशी तीरकस प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे आबीटकर यांना थेट पक्ष नेतृत्वाकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आबीटकर यांचे खास अभिनंदन केले आहे. चंद्रकांत पाटलांच्या गावातील विजय शिवसेनेसाठी अगदी खास असल्याचेच यावरून दिसत आहे.

गाव सांभाळून राजकारण करावं : मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही या निकालाच्या निमित्ताने पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण करताना गाव, तालुका, जिल्हा आणि कार्यकर्ते सांभाळून पुढे जावे लागते.

तसे चंद्रकांत पाटील यांनी केले नाही. त्यामुळेच त्यांच्या गावातच त्यांना पराभवाचा धक्का बसला. प्रदेशाध्यक्षांच्या गावातच भाजपची सत्ता नाही, असे उद्या त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते म्हणतील यात शंका नाही, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here