लसीकरणात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही : आरोग्यमंत्री
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला असताना राज्याराज्यांमध्येही लसीकरणाला शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उपस्थिती लावत लसीकरणाचा शुभारंभ केला.
यावेळी लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत असं म्हणत त्यांनी एका नव्या आणि सकारात्मक उर्जेनं जनतेला संबोधित केलं.
कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस मिळाली असली तरीही सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावर असणारा मास्क, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मास्कचं महत्त्वं पुन्हा एकदा पटवून देत मास्कला अंतर देणं योग्य नसल्याचं सांगितलं.
पंतप्रधानांनी ज्याप्रमाणं लसीच्या वापरानंतरही मास्कच्या वापरावर भर दिला, त्याचप्रमाणं मुख्यमंत्र्यांनीही कोरोनाचं संकट टाळण्यासाठी मास्कच्या वापराला प्राधान्य दिलं.
कोरोना सेंटरमध्ये सध्या जाणाऱ्यां रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे, हे चित्र असंच राहो अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
काही सुविधांचा उपयोग न होणं हे जास्त चांगलं आहे, असं म्हणत आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाचा नायनाट होईपर्यंत शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सुचनांचं पालन करण्यात यावं, आवाहन त्यांनी जनतेला केलं.
अब वो दिन दूर नही : आरोग्यमंत्री राजेश टोपे
देशात आणि राज्यात लसीकरणाचा दिवस अखेर उजाडला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि संशोधकांच्या अथक प्रयत्नानंतर देशभरात कोरोना लसींचं वितरण करण्यात आले आहे.
लसीकरणात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. केंद्राची मदत मिळो अथवा न मिळो, महाराष्ट्र राज्य शासन पूर्ण जबाबदारी निभावेल आणि महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.
त्याच धर्तीवर विविध टप्प्यांमध्ये लसीकरण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येणार आहे.
त्याबाबत पहिली प्रतिक्रिया देत टोपे म्हणाले, मागील दहा महिन्यांत ज्यांनी लाखोंच्या संख्येनं नागरिकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं आज त्यांना प्राधान्यानं लस दिली जात आहे.
कोरोनाच्या या काळात जवळपास 96 टक्के रुग्ण बरे करण्याचं काम आरोग्य विभागानं केलं, त्यांच्या प्रयत्नांना मी सलाम करतो.
सर्वसामान्यांच्या वाट्याला लस केव्हा येणार याबाबत सांगताना आता, तो दिवस लांब नाही असं आश्वासक वक्तव्य त्यांनी केले.
ज्यांची लस घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही, त्यांच्यापर्यंत योग्य किंमतीत किंवा पैसे न आकारता लस कशी दिली जाईल, याकडे आमचं लक्ष असल्याचं ते म्हणाले.
पहिल्या दोन तीन महिन्यांमध्ये प्राधान्यक्रमाचा टप्पा पूर्ण करुन सर्वसामान्यांपर्यंत लस पोहोचवली जाईल , तो दिवसही तितक्याच आनंदाचा असेल, या शब्दांत त्यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला.