कोलकाता: पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आता तृणमूल काँग्रेसची (TMC) चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) हे या निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्यासाठी काम करत आहेत.
त्यांनी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात सर्वात प्रतिष्ठेची लढत समजल्या जाणाऱ्या नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा पराभव होणार आहे.
प्रशांत किशोर यांच्या IPAC या संस्थेच्या अंतर्गत सर्वेक्षण अहवालातील माहिती बाहेर फुटल्याची चर्चा आहे. या सर्वेक्षण अहवालातील काही कागदपत्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील 30 मतदारसंघांमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळणार असल्याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. 30 पैकी 23 मतदारसंघात भाजपचा विजय होईल. तर तृणमूल काँग्रेसला केवळ पाच मतदारसंघांमध्ये विजय मिळेल, असे या अहवालात म्हटले आहे.
याशिवाय, सर्वात प्रतिष्ठेची लढत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात भाजपचे सुवेंदू अदिकारी ममता बॅनर्जी यांचा पराभव करतील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
मात्र, तृणमूल काँग्रेसकडून हा अहवाल खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नंदीग्राममध्ये भाजपचा मोठ्या फरकाने पराभव होईल. भाजप खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने ट्विट करुन केला आहे.
‘भाजपने 200 सीट जिंकू अशी केवळ हवा निर्माण केलेय’
‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले होते.
पश्चिम बंगालमध्ये भाजपला जिंकायचे असेल तर राज्यातील 60 टक्के हिंदू मतदारांना आपल्याकडे वळवावे लागेल. सध्याची परिस्थिती पाहता हिंदू मतदारांमध्ये भाजपविषयी तितकेसे ममत्त्व नाही.
ममता बॅनर्जी का जिंकतील?
ममता बॅनर्जी या 10 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अँटी-इन्कम्बन्सी निश्चित असेल. पण बंगालमधील जनता अजूनही ममता बॅनर्जी यांच्यावर प्रेम करते. त्यामुळे या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच बाजी मारेल, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.