गीता यथार्थ (Geeta Yatharth) यांनी ३ फेब्रुवारी रोजी आपला टॉयलेटमध्ये बसून दरवाजा अर्धा उघडा ठेवलेला फोटो सोशल मिडीयावर शेअर केला. त्यांच्या लहान मुलानं हा फोटो काढला आहे.
फोटोसोबत एक पोस्ट लिहून त्यांनी सांगितलं, की माझ्यासारख्या एकल आईचं आयुष्य हे असं असतं, जिला टॉयलेटमध्येही गरजेचं खासगीपण मिळत नाही.

गीता यांची ही पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली. लोकांनी ती शेअर करत त्यावर विविध प्रकारच्या बऱ्यावाईट कमेंट्सही केल्याचं दिसतं.

ट्रोल होऊ लागल्यानंतर त्यांनी अजून दोन दीर्घ पोस्ट्स लिहीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सगळ्या पोस्ट्सवर #bathroompic असा हॅशटॅग वापरला आहे.

अनेकांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधल्याबद्दल गीता यांच्या समर्थनात पोस्ट लिहिल्या आहेत. यात हिंदीतील अनेक लेखक, पत्रकार सहभागी आहेत.

मातृत्व निभावताना होणारे त्रास, समानतेचा अभाव असल्यानं स्त्रीलाच बहुतांशवेळा पालकत्वाचं ओझं वहावं लागणं या मुद्द्यांची चर्चा यानिमित्तानं होत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

फोटोवर कालपासून गीता यांचं अनेकांनी अभिनंदन केलं. मात्र या फोटोला असभ्य आणि अश्लील ठरवत गीता यांना विखारीपणे ट्रोलसुद्धा केलं जात आहे.
गीता या भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात उच्चपदस्थ अधिकारी आहेत. आजवर त्यांनी सातत्यानं हिंदी माध्यमांमध्ये विविध सामाजिक-सांस्कृतिक मुद्द्यांवर लिहून लोकांचं लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडियावरही त्या विविध मुद्द्यांवर तार्किकपणे आपली मतं मांडत असतात. हाथरसमध्ये नुकत्याच एका मुलीच्या छेडछाडीनंतर तिच्या वडिलांना गोळ्या घालून ठार मारल्याची घटना घडली. यावर त्यांनी ताजी पोस्ट लिहिली आहे.


विदेशातही आजवर अनेक महिलांनी असेच फोटो पोस्ट करत व्यथा मांडली आहे. त्याचे फोटोही गीता यांनी एका पोस्टमध्ये टाकले आहेत.