या जोडप्याच्या कौन्सलिंगनंतर खरे ‘कारण’ असल्याचे स्पष्ट झाले.
भोपाळ : कोरोना व्हायरसच्या (COVID19) भीतीने अनकेजण धास्तावले आहेत. त्याचा नाते संबधांवरही मोठा परिणाम झाला आहे.
लॉकडाऊनमध्ये (Lockdown) बराच काळ एकाकी राहिल्याने काही जणांमध्ये नैराश्य आले आहे. मानवी नातेसंबंधावरही याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळमध्ये (Bhopal) कोरोना फोबियामुळे एक विचित्र पेच निर्माण झाला. नुकतेच लग्न झालेला पती सोशल डिस्टन्सिंग ठेवत असल्याने रागवलेल्या पत्नीने थेट कोर्टात धाव घेतली.
पतीची उदासीनता आणि त्याचबरोबर सासरची मंडळी देखील छळ करतात असा आरोप करत ‘त्या’ महिलेने कोर्टात धाव घेतली. आपल्यापुढे सर्व आयुष्य बाकी असून नवऱ्याने आपल्या पालण-पोषणाचा खर्च द्यावा अशी मागणी तिने कोर्टात केली.
काय आहे नेमके ‘कारण’
या प्रकरणातील दाम्पत्याचे लग्न 29 जून रोजी झाले होते. त्यांचे लग्न होण्याच्या काळात सर्वत्र कोरोना व्हायरसची दहशत होती.
या दहशतीमुळेच पतीने पत्नीच्या जवळ जाणे टाळले. पतीच्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवण्याच्या धोरणाला पत्नी कंटाळली आणि रागावून माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने नवऱ्याच्या विरोधात कोर्टात धाव घेतली.
लग्नानंतर पती फोनवर चांगला बोलतो पण जवळ येत नाही अशी महिलेची तक्रार होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. तक्रारदार पत्नीच्या माहेरच्या मंडळीने हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.
मेडिकल रिपोर्टनंतर वाद सुटला
कोर्टाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रारदार महिलेच्या नवऱ्याला मेडिकल रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले. कोर्टानं आदेश दिल्यानंतर पतीला पुरुषत्वाचेही प्रमाणपत्र कोर्टात सादर करावे लागले .
अखेर मेडिकल रिपोर्ट समोर आल्यानंतर तक्रारदार महिलेचा संशय दूर झाला. त्यानंतर ती नवऱ्यासोबत सासरी जाण्यास तयार झाली. दरम्यान कोर्टाने या जोडप्याला कोरोना फोबिया दूर करण्यासाठी कोव्हिड टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.