महिलेवर कथित चोरीचा आरोप | पोलिसांच्या छळाला कंटाळून महिलेच्या कुटुंबाने केली ‘सामूहिक आत्महत्या’

268
Woman charged with alleged theft

मडगाव : एका महिलेवर कथित चोरीचा आरोप आणि त्यातून होणाऱ्या पोलिसांच्या छळाला कंटाळून महिलेच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे.

मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर झुआरीनगर परिसर हादरून गेला.

पती, पत्नी आणि लहान दिराने एमईएस महाविद्यालयाजवळच्या अमन कॉलनीतील भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

आत्महत्या केलेल्यामध्ये हुलगप्पा अंबिगेर (30), पत्नी देवम्मा अंबिगेर (25) आणि गंगप्पा अंबिगेर (25) अशी मृतांची नावे आहेत.

कथित चोरीचा गुन्हा नोंद न करता पोलिसांनी या तिघाजणांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

या दाम्पत्यास आठ आणि दहा वर्षांच्या दोन मुली आहेत. कुटुंबातील सर्वांच्या मृत्यूमुळे ही दोन्ही मुले पोरकी झाली.

अंबिगेर कुटुंब मूळ कर्नाटकाच्या विजापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. गेल्या दहा वर्षांपासून गोव्यात मोलमजुरी करून हे कुटुंब राहत होते.

कोव्हिडनंतर दहा दिवसांपूर्वी सर्वजण पुन्हा गोव्यात परतले होते. देवम्मा आणि हुलगप्पा हे पती-पत्नी आहेत. त्यांना मलम्मा आणि मनसुरी नावाच्या दोन मुली आहेत.

अमन कॉलनी येथे शमशुद्दीन खान यांच्या घरी हे कुटुंब भाड्याने राहत होते. त्यांच्यासोबत गंगप्पा नामक त्यांचा लहान भाऊ वास्तव्यास होता.

देवम्मा ही याच भागातील एका घरात घरकामाला होती. त्या घरातून नुकताच काही मौल्यवान ऐवज चोरीला गेला होता.

घरमालकाने देवम्मा हिच्यावर चोरीचा आळ घालून वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार दिली होती.

मयत हुलगप्पाचा भाऊ मलप्पा (मडगाव) याने दिलेल्या माहितीनुसार, चोरीचा गुन्हा पोलिसांनी नोंद करून घेतला नव्हता.

मात्र चौकशीच्या नावाखाली हुलगप्पा, देवम्मा आणि गंगप्पा यांना सतत दोन दिवस पोलिस स्थानकात बोलावून त्यांना मारहाण केली जात होती.

मृत्यूच्या आदल्या दिवशी हुलगप्पा याने फोन करून आपल्याला पोलिसांनी जबर मारल्याचे सांगितले होते.

मारहाणीमुळे आपल्याला धड चालतासुद्धा येत नसल्याचे सांगितले होते. देवम्मा हिचा चोरी करतानाचा व्हिडीओ आहे, असे पोलिस म्हणत होते.

त्यामुळे तिने चोरीचा आरोप मान्य करावा यासाठी पोलिस तिच्यावर दबाव टाकत होते. आपले दोन्ही भाऊ आणि वहिनीच्या मृत्यूला पोलिस जबाबदार आहेत, असा आरोप त्याने केला आहे.

पोलिसांनी सोमवारी हुलगप्पा याला चौकशीसाठी बोलावले होते, नंतर पुन्हा मंगळवारी तिघांनाही वेर्णा पोलीस स्थानकात बोलाऊन जबर मारहाण केली गेली, असा कुटुंबीयांचा आरोप आहे.

बुधवारी देवम्माने गंगप्पा याला दुकानातून साहित्य आणायला पाठवले आणि तिघांनीही कपड्याचा साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी शक्यता कुटूबीयांनी व्यक्त केली आहे. सोबतच हा घातपाताच प्रकार असू शकतो, असेही ते म्हणाले.

पोलिसांनी पंचनामा करून तिघांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवुन दिले.

पोस्टमार्टेम झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलिस त्यांच्या कुटुंबियांवर दबाव टाकत होते, पण सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले नव्हते.

गंगप्पाची पत्नी गर्भवती

मयत गंगप्पा याचा नुकताच विवाह झाला होता. गावात त्याची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे.

कोव्हिडच्या भीतीने त्याने पत्नीला गावी ठेवून तो गोव्यात काम करण्यासाठी आला होता.

त्याच्या मृत्यूची माहिती अजून त्याच्या पत्नीला देण्यात आलेली नाही, असे प्रभू याने सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here