मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या महिलेने एकामागे एक ट्विट करीत आता यु टर्न मारला आहे.
भाजप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला आता नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. राष्ट्रवादी बचावासाठी पुढे आली तर याप्रकरणात भाजपा सावध भूमिका घेत आहे.
भाजपा व मनसे नेत्यांनी आपल्याला या महिलेने गळ घातल्याची तक्रार या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानंतर रेणू शर्मा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना या प्रकरणातून माघार घेण्याबाबत भूमिका मांडणारे ट्विट केले आहे.
त्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘एक काम करा, तुम्ही सर्वांनीच निर्णय घायावा, कोणतीही माहिती करून न घेता जर तुम्ही आणि जे मला ओळखतात ते सुद्धा चुकीचे आरोप लावत असतील तर तुम्ही सर्वांनी मिळूनच निर्णय घ्या, मीच मागे हटते जसे तुम्हा सर्वांना हवे आहे.’
रेणू शर्मा पुढे म्हणतात, ‘जर मी चुकीची असेन तर मग इतके सारे लोक आतापर्यंत पुढे का येऊ शकले नाहीत. मी माघार घेतली तरी देखील माझा मला स्वत:ला अभिमान असणार आहे.
याचे कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होते. तसे पाहिले तर मी कोणत्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही.
आता मला हटवण्यासाठी आणि खाली पाडण्यासाठी इतक्या लोकांना यावे लागत आहे. आता तुम्हाला जे काही लिहायचे आहे ते बसा आणि लिहा.
‘आम्हालाही या महिलेने गळ घातली’
या महिलेने आम्हालाही गळ घातल्याची तक्रार भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत केली आहे. भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी देखील संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली आहे.
हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप मनसेचे एक पदाधिकारी मनीष धुरी यांनीही केला आहे. या बरोबरच जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने या महिलेबाबत अशाच प्रकारची तक्रार केली आहे.