औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी ‘गायब’ झाली आहे.
ही तरुणी अचानक ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेत आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
आरोपीला अटक करत नाही तोवर पोलिसांनी घरी येऊ नये, असा पवित्रा तरुणीने घेतला होता.
काय आहे प्रकरण?
औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.
औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका अल्पसंख्याक तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले.
तरुणीने तक्रारीत म्हटले होते की, 10 नोव्हेंबर रोजी मला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावले होते.
14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला.
तरुणीने याबाबत औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रा दिली होती.
त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मेहबूब शेख यांचा खुलासा
गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या आठवड्यात शेख यांनी याबाबत खुलासा केला होता.
त्यांनी म्हटले होते की, “औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकार मित्राकडून मिळाली.
त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे मेहबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली.
मी कधीही संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो नाही किंवा फोनवरही बोललेलो नाही.
मी 10 आणि 11 तारखेला मुंबईत होतो. माझे मुंबईत कार्यक्रम होते.
14 नोव्हेंबरला मी बीड जिल्ह्यातील शिरुर कासार या माझ्या गावाकडे होतो.
पोलिसांना सर्व पुरावे तसंच माहिती देण्यास मी तयार आहे.
या प्रकरणामागे कोण आहे?, याचा पोलिसांनी शोध घ्यावा”.
मेहबूब शेख यांनी त्यांच्या फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत संबंधित तरुणीने केलेले सगळे आरोप फेटाळून लावले.
“संबंधित तरुणीशी माझा कसलाही संबंध नाही. मी तिला कधीही पाहिलं नाही किंवा भेटलेलो नाही.
एखाद्या व्यक्तीने एवढ्या मेहतीने उभं केलेलं राजकीय आयुष्य इतक्या घाणेरड्या आरोपांनी उध्वस्त करु नये.
यामागे कुणाचं षडयंत्र आहे?, या प्रकरणामागे कोण राजकीय लोकं आहेत?
त्या महिलेचा बोलविता धनी कोण आहे?, याची पोलिसांनी कसून चौकशी करावी.
गरज पडली तर माझी नार्को टेस्टचीही तयारी आहे.
जर आरोप सिद्ध झाले तर मी फासावर जायला तयार आहे” असं मेहबूब यांनी फेसबुक व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं.
भाजपची राज्यभर आंदोलने
मेहबूब यांच्यावर झालेल्या आरोपानंतर विरोधी पक्ष भाजपने आक्रमक रुप धारण केलं.
”शिवछत्रपतींचा महाराष्ट्र फक्त बोलण्यात नको तर आचरणातही हवा”, असं म्हणत या प्रकरणाचा धागा पकडून महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी सडकून टीका केली.
भाजपची विद्यार्थी-युवक संघटना तसंच पक्षातील प्रमुख नेते कार्यकर्ते महाराष्ट्रातील विविध शहरांत मेहबूब यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले.
राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर, औरंगाबाद, जळगाव, नवी मुंबई तसंच इतरही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली.
औरंगाबादेतील आंदोलनात तर माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही आमदारांनी निदर्शने केली.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत मेहबूब यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
“जर एखादा सर्वसाधारण आरोपी असता तर तर त्याला लगेच अटक केली असती.
आता राजकीय पदाधिकाऱ्याला आणि विशेष म्हणजे सत्तेतील पक्षातल्या एका पदाधिकाऱ्याला वेगळा न्याय का?” असा सवाल केला होता.
औरंगाबाद पोलिसांनी पीडितेला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला जेरबंद करावं, अशी मागणी केली.